काय म्हणताय? भेटायला हवीत का वाचायला हवीत? काहीतरी गोंधळ होतोय तुमचा. नाही, नाही मला भेटायला हवी अशी पुस्तके हेच म्हणायचय.
जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला प्रत्यक्ष भेटते तेव्हा त्या व्यक्तीच्या बोलण्याबरोबरच तुम्हाला त्या व्यक्तीचा आवाज, चेहऱ्यावरील हावभाव, बोलण्यातला आवेश, किंवा संवेदना या सर्व गोष्टींनी जसा पूर्णपणे भेटण्याचा आनंद मिळतो तसाच काही पुस्तकांच्या बाबतीत त्या पुस्तकांचे मुखपृष्ठ, आतील रेखाचित्रे, पुस्तकाची बांधणी, आकार व टेक्सचर (हाताला जाणवणारा कागदाचा पोत) या सर्व गोष्टीमुळे पुस्तक वाचायचा एक वेगळाच अनुभव येतो. अशी अनेक पुस्तके आहेत की भाषा आणि गोष्टी बरोबरच रंग, रूप, पोत, स्पर्श आणि आवाज सुद्धा अशा अनेक जाणिवांना स्पर्श करत आपल्याला एक वेगळा अनुभव देतात. इतकेच नव्हे तर दरवेळी पुस्तक नव्याने हातात घेताना आपल्याला एका नव्या जाणिवेची ओळख होते. या चित्र पुस्तकांची किंवा चित्रकथांची आणखीन एक मजा आहे. चित्रांची भाषा कळायला कोणत्याही औपचारिक शिक्षणाची गरज नाही. प्रत्येक वाचक त्याच्या किंवा तिच्या अनुभवाप्रमाणे, आवडीप्रमाणे, स्वभावाप्रमाणे, किंवा विचार पद्धती नुसार एखाद्या गोष्टीचे रसग्रहण करू शकते. म्हणजेच विचारांचा आणि भावनांचा मिलाप होणारच.
बऱ्याच वेळा अशी चित्र पुस्तके किंवा इलस्ट्रेटेड बुक्स ही लहान मुलांकरता समजली जातात. पण माझ्या मते ते तितकंसं बरोबर नाही. मुले या पुस्तकांचा आनंद नक्कीच घेतील पण त्याबरोबर मोठ्या व्यक्ती सुद्धा ज्यांचं मन थोडं तरी बालपणात किंवा कल्पना विश्वात रमू शकतं या सर्व जणांना ही पुस्तके नक्कीच खूप आवडते असा मला विश्वास आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांबरोबर किंवा मित्रमंडळींबरोबर एकत्र वाचायला आणि बघायला ही पुस्तकं अतिशय सुंदर आहेत.
अशी काही सुंदर पुस्तके आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा ब्लॉग सुरू करण्याची इच्छा आहे. जर हा ब्लॉग आवडला तर जरूर कळवा.
